शहापूर: शहापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम असून गुरुवारी रात्री बरसलेल्या जोरदार पावसात वेहलोंढे ग्रामपंचायत हद्यीतील सापटेपाडा येथील त्र्यंबक पाचालकर यांच्या राहत्या घराचे छप्पर पावसाच्या माऱ्याने कोसळले. यात त्र्यंबक पाचालकर, लाडक्या पाचालकर, जानी ‘पाचालकर, शांता पाचालकर व विजय पाचालकर हे जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री घडली.
जखमींवर जवळच्या अघई गावातील जि. प. च्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. तर लाडक्या पाचालकर व जानी पाचालकर हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना अघई आरोग्य केंद्रातून पुढील उपचारांसाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. वेहलोंढे ग्रामपंचायत हद्यीतील सापटेपाडा हे २ किमीचे अंतर असून मात्र अद्यापही रस्त्याची सुविधा नसल्याने अखेर गावकऱ्यांनी रात्रीच्या काळोखात चादरीची झोळी करुन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.