कर्जत: कर्जत तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीतून कत्तलीसाठी नेत असलेल्या पाच गुरांची येथील गोरक्षकांनी सुटका केली. या प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्टमधील पोलिसांनी चार तरुणांना ताब्यात घेतले असून त्यातील तीन तरुण आदिवासी आहेत.
बोरगाव येथून कळंब प्राथमिक आरोग्य रस्त्याने पाच गोवंशीय जनावरे नेली जात असताना तेथील एका गोरक्षकाने या गुरांबाबत विचारणा केली असता त्यातील एकाने बैलांना घेऊन साळोख येथे जात असल्याचे सांगितले. मात्र, या गोरक्षकाला संशय आल्याने त्याने त्वरित त्याच्या मित्रांना फोन करून याबाबतची माहिती समाजमाध्यमावर दिली. त्यावर काही गोरक्षक कळंब आऊट पोस्ट पोलीस ठाणे येथे पोहोचले व पोलिसांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी बोरगाव फाटा येथे धाव घेतली, मात्र तेथे कोणीच दिसून आले नाही. त्यावर त्यांनी आजूबाजूची पाहणी केली असता ही मंडळी आड मार्गाने हे पाच बैल घेऊन साळोख गावच्या दिशेने जात असल्याचे आढळले. त्यावर पोलिसांनी व गोरक्षकांनी या चौघांना पाच बैलांसह ताब्यात घेऊन कळंब आऊट पोस्ट येथे आणले.
त्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता बोरगाव भागातून ते बैल आणले असून ते कत्तलीसाठी साळोख येथे घेऊन जात असल्याची कबुली त्यांनी दिली. त्यावर पोलिसांनी या पाच बैलांना पोलीस ठाण्याच्या मागे बांधले व नेरळ येथील स.पो.नि. शिवाजी ढवळे यांना माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी साळोख गावातील शगफ बुबेरे, अजय चंद्रकांत चवर, मर्नश अशोक वाघ आणि एका अल्पवयीन बालकाविरोधात गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसावे करत आहेत. या पाच गुरांची सुटका केल्याबद्दल या भागातील नागरिकांकडून या गोरक्षकांचे कौतुक केले जात आहे.