नवी मुंबई: बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा कोपरखैरणे येथे राहणाऱ्या तरुणासोबत बेकायदेशीररीत्या विवाह करून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नानंतर कोपरखैरणे येथे नांदण्यासाठी आलेली पीडित मुलगी घरातून पळून गेल्यानंतर ती रेल्वे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर तिचा बालविवाह करण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी बालकल्याण समितीच्या आदेशावरून पीडित मुलीसोबत लग्न करणारा तिचा पती, सासू, नणंद व पीडित मुलीची आई या चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच सदरचा गुन्हा पुढील तपासासाठी बीड येथील आंबेजोगाई पोलिसांकडे वर्ग केला आहे.
या घटनेतील १७ वर्षीय पीडित मुलगी बीड जिल्ह्यात राहण्यास असून, तिच्यासोबत लग्न करणारा तरुण कोपरखैरणे सेक्टर-१९ मध्ये राहण्यास आहे. पीडित मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झालेले नसताना पीडित तरुणीचा ११ नोव्हेंबर २०२३ रोजी कोपरखैरण्यातील तरुणासोबत आंबेजोगाई येथे विवाह लावून देण्यात आला होता. लग्नानंतर पीडित मुलगी नांदण्यासाठी कोपरखैरणे येथे पतीच्या घरी आली होती. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील तिच्या पतीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवून तिचे लैंगिक शोषण केले.
दरम्यान, पीडित मुलगी काही दिवसांपूर्वी कोपरखैरणे येथील घर सोडून निघून गेली होती. त्या वेळी ती चर्चगेट रेल्वे स्थानकात रेल्वे पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले होते. त्यावेळी पीडित मुलीने तिचे कोपरखैरणे येथे राहणाऱ्या तरुणासोबत लग्न लावून देण्यात आल्याचे व पतीकडून तिचे लैंगिक शोषण होत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर बालकल्याण समितीने याबाबत पीडित मुलीचा जबाब नोंदवून तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार कोपरखैरणे पोलिसांनी या प्रकरणात अल्पवयीन मुलीसोबत विवाह करणारा तिचा पती, सासू, नणंद आणि पीडित मुलीची आई या चौघांविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.