रायगड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर येत आहे. यामध्ये दोन एसटी बसेस समोरासमोर धडकल्या असून यामध्ये 25 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणे जवळ हा अपघात झाला आहे. मुंबईवरुन राजापूरकडे जाणाऱ्या बसला मुंबईकडे जाणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. बसेस एकेमकांवर आदळल्याने नागोठणे परीसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.
महामार्गावर वाहतूक कोंडी..
आजपासून राज्यामध्ये गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी मुंबईहून कोकणात जात आहेत. यंदा कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यंदा सुखकर होईल अशी अपेक्षा होती. परंतु, तसे झाले नाही. यंदाही महामार्गावर वाहतूक कोडींचे विघ्न प्रवाशांना अनुभवायला मिळाले आहे.
सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..
रात्री गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघाले. मुंबईतून दीड हजाराहून अधिक एसटीच्या बसेस कोकणच्या दिशेने सोडण्यात आल्या होत्या. या शिवाय खाजगी वाहनेही हजारोच्या संख्येने तळ कोकणात जाण्यासाठी बाहेर पडली. यामुळे महामार्गावरील वाहनांची संख्या अचानक वाढली आहे. त्यामुळं महामार्गावर कोंडी निर्माण झाली आहे. दोन्ही मार्गिकांवर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे. सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.