कर्जत: तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीमधील चिंचवली ते एकसळ रस्त्यावरील नाल्यावर मोठा पूल आहे. त्या पुलाची उंची अधिक आहे. एखादे वाहन त्या पुलावर खाली कोसळले तर ते किमान ३० फूट खोल जाऊन पडेल. या पुलाचे संरक्षण कठडे अनेक वर्षे गायब आहेत. दरम्यान, पुलावरून रात्रीच्या वेळी वाहन खाली कोसळण्याची भीती असून स्थानिकांनी पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. चिंचवली ग्रामपंचायतीमध्ये एकसळ गाव आहे. गावाच्या प्रवेशद्वाराच्या अगोदरच एक ओहळ आहे. ओहळावर असलेल्या पुलाला संरक्षण कठडे राहिले नसल्यामुळे वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.
रात्री-अपरात्री एखादे वाहन ओहोळात जाऊ शकते. दोन्ही बाजूला कठडेत राहिलेले नाहीत. त्यात ओहळाची उंची २५ ते ३० फूट आहे. संबंधित पुलाच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण मागील वर्षभरात सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करून कठडे उभारण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.