माथेरान: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने २० ई-रिक्षा प्रायोगिकतत्त्वावर चालवण्यासाठी परवानाधारक हातरिक्षा चालकांना देणार असल्याने त्याची सोडत माथेरान नगरपालिका कार्यालयात घेण्यात आली. २४ अर्ज नगरपालिकेत प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशाने ही सोडत माथेरान नगरपालिकेत घेण्यात आली. यामध्ये २० हातरिक्षा चालकांचे नशीब चमकले आहे.
सनियंत्रण समितीचे सचिव हे रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असून त्यांच्याकडून आलेल्या आदेशाने सोमवार, २७ मे रोजी दुपारी ४ वाजता ही सोडत घेण्यात आली. दरम्यान, २४ अर्ज दाखल झाले असून त्यावर काही आक्षेप असल्यास बोलावे, असे मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सांगितले. पण मुख्य विषयासंदर्भातच बोलावे. त्यावर कोणाचाही आक्षेप नसल्याने सोडतचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, ऋजुता प्रधान यांच्या एका लायसनवर दोन रिक्षा देता येत नसल्याने त्यांचा एक अर्ज बाद करण्यात आला. उर्वरित २३ अर्जदारांची सोडत घेण्यात आली. अर्णव शेखर जाधव या शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते पारदर्शकपणे सोडत काढण्यात आली. यामध्ये बंद बरणीमधून एक एक चिठ्ठी काढत एकूण वीस चिठ्ठया बाहेर काढण्यात आल्या आणि शेवटच्या राहिलेल्या तीन चिठ्या बरणीतच ठेवण्यात आल्या. नंतर बाहेर काढलेल्या चिठ्ठया खोलून त्यांची नावे पुकारण्यात आली.
अशा एकूण वीस हातरिक्षा चालकांच्या नावाच्या चिठ्ठया पारदर्शकपणे काढण्यात आल्या आणि त्या सर्वानुमते मंजूरदेखील करण्यात आल्या. याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला दिला जाईल. याबाबत कोणाला काही तक्रार असेल तर त्यांनी मंगळवारपर्यंत लेखी स्वरूपात द्याव्यात. त्या वरिष्ठांकडे सादर केल्या जाणार आहेत. याप्रसंगी हातरिक्षा चालकमालक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनील शिंदे, सर्व हातरिक्षा संघटनेचे टनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तर नगरपालिकेचे लिपिक सदानंद इंगळे, लेखापाल अंकुश इचके यांनी पारदर्शक काम पाहिले.