अलिबाग : महिनाभरामध्ये तापमानाने उच्चांक गाठल्याने त्याचा परिणाम भूगर्भातील पाणीसाठा व नद्यांतील पाण्यावर झाला आहे. यामुळे मुंबईला लागून असलेल्या अलिबाग तालुक्यातील नागरिकांना आता पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तालुक्यात सध्या दोन ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला असला तरी आणखी काही गावांमधून टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.
अलिबाग तालुक्यात सध्या ३८ ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोहोचल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पिभवन होऊ लागले आहे. यामुळे विहिरी, नद्या-नाले यातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. पाण्याचे मूळ स्त्रोतच आटल्याने दोन गावांना आता टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. तालुक्यांमध्ये दरवर्षी सरासरी सुमारे ८ ते १० ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या वर्षी सध्या दोन गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.
उन्हाळ्यामुळे केवळ गावात येणाऱ्या टँकरवरच ग्रामस्थांना अवलंबून राहावे लागत असल्याने शेतकऱ्यांकडे असणाऱ्या जनावरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरांना वेळच्या वेळी पाणी न मिळाल्यास याचा परिणाम दूध उत्पादनावरदेखील होतो. अलिबाग तालुक्यामध्ये काही गावांमध्ये दूध दुभत्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अनेक कुटुंब या व्यवसायावरच अवलंबून आहे. त्यामुळे गावात पाणी नसल्याने जनावरांना दूरच्या ठिकाणी पाण्यासाठी जावे लागत आहे.