नालासोपारा: कुणाची बुद्धी कशी चालेल, याचा काही नेम नाही. सध्या सुशिक्षित बेरोजगारांना टार्गेट करून पैसे लुबाडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. अशाच एकाने तोतया आयकर आयुक्ताचा रुबाब दाखवून तब्बल ४० जणांना गंडा घातल्याचा प्रकरण समोर आले आहे. रिंकू शर्मा असे तोतयाचे नाव असून तो फक्त सहावी शिकला आहे. ७ जानेवारी रोजी तळोजा येथून मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय गुन्हे शाखेच्या विरार युनिट ३ ने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रिंकू शर्मा हा बीकेसी येथील आयकर विभागाच्या कार्यालयात ठेका पद्धतीवर वाहन चालकाचे काम करत होता. त्याचे व्यक्तिमत्त्व आणि अधिकाऱ्यांची असलेली जवळीक तसेच ते कसे बोलतात, वागतात याची त्याने रेकी केली होती. तो चालक असल्यामुळे त्यांच्या गाड्या घेऊन तो वसई- विरारमध्ये अंबरच्या गाडीत फिरत होता. कधी तो बीएमडब्ल्यू गाडी, इनोव्हा फॉर्च्यूनर अशा महागड्या गाड्या घेऊन फिरत असे. त्यामुळे तो बडा अधिकारी असावा, असा अनेकांचा विश्वास बसत होता.
तो सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना आयकर विभागात वरिष्ठ पदावर नोकरी लावून देतो, अशी बतावणी करत त्याने सुमारे दोन कोटींपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पेल्हार पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील एका पीडित व्यक्तीने फसवणूक झाल्याची तक्रार केली होती.
आरोपी रिंकू शर्मा याने आपण आयकर आयुक्त असल्याचे भासवून त्यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा लाखांची फसवणूक केल्याची तक्रार पेल्हार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार, मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालय गुन्हे शाखेच्या विरार युनिट ३ ने सापळा रचला आणि त्याला तळोजा येथून ताब्यात घेतले. रिंकू शर्मा स्वतः आयकर आयुक्त (आय.आर.एस.) अधिकारी असल्याचे भासवून आयकर विभागाचा लोगो असलेले अंबर दिव्याचे वाहन वापरून पीडितांच्या मुलाला, मुलीला आयकर विभागात आयकर निरीक्षक या पदावर नोकरी लावून देतो, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यांच्याकडून वेळोवेळी ५ लाख रुपये घेऊन फिर्यादीच्या मुलीस आयकर निरीक्षक बनावट ओळखपत्र व नियुक्ती पत्र देऊन फसवणूक केली, म्हणून दोन आरोपींविरुद्ध पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अनेकांना त्याने सरकारी सह्या शिक्के असलेले जॉइनिंग लेटर, ओळखपत्र दिले, जसजसे लेटर मिळेल तसतसे टप्प्याटप्याने पैसे द्या, एक लेटर दिले की पाच लाख, दहा लाख आणि ओळखपत्र दिले की उर्वरित रक्कम असे तो पैसे उकळत असे. गरजूंना तो आयकर विभागाच्या कार्यालयात घेऊन जात असे. तेथील कॅण्टीनमध्ये लोकांना नाश्ता द्यायचा आणि साहेब आता बिझी आहेत, असे सांगून लोकांना बाहेरच्या बाहेर रवाना करत असे.
आता आयकर विभागाच्या कार्यालयात घेऊन जात असल्याने लोकांना त्याच्यावर विश्वास बसला. मात्र काही जणांना त्याचा संशय आल्याने तो बोगस असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार केली. भिलार पोलिसांचा तपांस सुरू असतानाच समांतर तपास करणारे मीरा-भाईंदर वसई-विरार आयुक्तालयाचे युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या पथकाने शिताफीने तळोजा रिकू शर्मा याला वसई न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.