मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठीची हमरातुमरी आणखी वाढली आहे. मंत्री भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रीपद मिळाले नाही, तर मोठा उठाव होईल, असा इशाराच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिला आहे. तर, पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल, थोडासा धीर धरा, धीरे, धीरे… असा सबुरीचा सल्ला देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य निर्णय घेतील, असे म्हटले आहे.
शाह दोन दिवसांसाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शनिवारी रायगड किल्ल्याला भेट दिल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच पुन्हा नव्या संघर्षासह सुरू झाली आहे. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी यावर बोलताना, आम्हाला निश्चित न्याय मिळेल. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नियोजित दौऱ्यात सुतारवाडीतील सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन कार्यक्रम आहे. मात्र, पालकमंत्री पदासाठी बंद दाराआड चर्चा करण्याची काहीच गरज नाही.