पालघर : पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांची बदली झाली होती परंतु त्यांनी पदभार सोडलेला नव्हता.
मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने त्यांच्या कार्यालयात सापळा रचून मोठ्या शिताफीने कार्यालयातच त्यांना अटक केली. पालघर मधून त्यांची बदली रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे झाली होती. मात्र एक वर्ष वाढवून मिळावे ह्यासाठी ते प्रयत्न करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडा येथील एका आदिवासी खातेदारकाची जमीन नावावर करण्यासाठी तक्रारदार आपलं प्रकरण मंजूर करण्यासाठी गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झाल्या होत्या तरी सुद्धा मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच मागितली होती.
तक्रारदाराला लाचदेऊ शकत नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कार्यालयात आले. त्यानंतर तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच 50 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू राहिली.