अलिबाग : रायगड जिल्ह्यात मलेरियाचे प्रमाण घटले असले, तरी डेंग्यूचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यात डेंग्यूचे ४४६ रुग्ण आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे यातील ११२ रुग्ण हे ऑगस्ट महिन्यात गेल्या २१ दिवसातील आहेत. पूर्वी पनवेल महानगर पालिका क्षेत्रापुरता मर्यादित असलेला डेंग्यू आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फैलावला असल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात जिल्ह्यात ४ हजार ४६४ जणांची डेंग्यूसाठी तपासणी करण्यात आली. यात ४४६ जणांना डेंग्यूची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. यात पनवेल महानगर पालिका क्षेत्रातील १८२ तर रायगड ग्रामीणमधील २६४ रुग्णांचा समावेश आहे. यावरून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा प्रादुर्भाव सरू झाल्याचे दिसून येत आहे. पूर्वी डेंग्यूचे बहुतांश रुग्ण हे पनवेल महानगरक्षेत्रात आढळून येत असत.
मात्र गेल्या वर्षभरात रायगडच्या ग्रामीण भागातही डेंग्यूचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्यात गेल्या २१ दिवसांत ११२ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. यात पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ६६, तर रायगड ग्रामीणमधील ४६ रुग्णांचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोप्रोली, खोपटे, अलिबाग तालुक्यातील वाघ्रण, कावाडे, सारळ, तर पेण तालुक्यातील जिते गावात डेंग्यूची संसर्ग वाढल्याचे दिसून आले आहे. ही एक चिंतेची बाब आहे. त्यामुळे मच्छरांची उत्पत्ती टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र यासाठी दरवर्षी जून महिन्यात केली जाणारा फवारणी यंदा करण्यात आलेली नसल्याची बाब समोर आली आहे.