कल्याण: कल्याणमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील अंबरनाथ शहराच्या सीमेलगत असलेल्या नाळिंबी गावाच्या हद्दीतील तीन झाडी परिसरात एका व्यक्तीचा शीर नसलेला मृतदेह आढळून आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच कल्याण ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा मृतदेह अंबरनाथच्या तीन झाडी परिसराच्या पुढे, रस्त्यापासून काही अंतरावर, कल्याण तालुक्यातील नाळिंबी गावाजवळ आढळला आहे.

या परिसरात नागरिक फिरण्यासाठी किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात. याठिकाणी प्रेमी युगल, पर्यटक, तसेच सहकुटुंब लोक फिरायला येतात. या परिसरात शीर नसलेला मृतदेह सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इसमाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक जगदीश शिंदे आणि कल्याण ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेश कदम पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.







