मुंबई: वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार याने काशीगाव येथे घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी घडली. सागर अथनिकर (२३) असे मृत हवालदाराचे नाव आहे. तो २०२३ मध्ये झालेल्या पोलीस भरतीत पोलीस हवालदार म्हणून लागला होता.
सागर बसगोंडा अथनिकर (मूळ रा. बेळुंखी, तालुका जत) जिल्हा सांगली येथील आहे. तो २०२३ च्या पोलीस शिपाई भरतीत मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयात नवप्रविष्ट पोलीस हवालदार पदावर भरती झाला होता. त्याने पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव जिल्हा लातूर येथे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तो आयुक्तालयाच्या मुख्यालयात नियंत्रण कक्षात कार्यरत होता. काशीगाव येथील अपना घर या गृहसंकुलात तो व त्याचा पोलीस मित्र भाड्याने राहत होते. रविवारी संध्याकाळी सागरने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सागर रूममध्ये झोपला होता. त्याला बघण्यासाठी गेले असता त्याच्या सहकारी पोलीस मित्राला सागर पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला.
त्याठिकाणी मोबाईल खिडकीला लावला होता. त्यात पूर्णपणे व्हिडीओ शूटिंग झाले आहे. यामध्ये सागरने एक व्हिडीओ बनवत लाइव्ह कॅमेरा आत्महत्या केली आहे. मी जीवनाला कंटाळलो असून माझी कोणाविरोधात काहीही तक्रार नाही, असा व्हिडीओ बनवला आहे. याची माहिती तत्काळ काशीगाव पोलिसांनी देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सागरचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सागरच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबीयांना कळवण्यात आली आहे. काशीगाव पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर हे करत आहेत.