पालघर : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना बॅगांच्या झाडाझडतीची जोरात चर्चा सुरु आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, टीका-प्रतिटीका, टोला-प्रतिटोला असं शाब्दिक युद्ध रंगलं आहे. बॅगांच्या झडतीचा व्हिडिओ करतानाच या घटनेवरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांवर टीकेची झोड उठवल्यानंतर हा मुद्दा अधिकच चर्चेत आला. आता ठाकरे, फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांच्या बॅगांची तपासणी केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडील बॅगा देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्या आहेत.
पालघरमधील कोलवडे पोलीस परेड मैदानावरील हेलिपॅडवर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर उतरलं. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री शिंदेंकडील बॅगांची तपासणी करण्यात आली. राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे आज पालघरमध्ये महायुतीतील शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेसाठी ते आले आहेत.
हेलिकॉप्टर उतरले आणि तपासल्या बॅगा..
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेना उमेदवार गावित यांच्या प्रचारासाठी पालघरमध्ये आले असताना पालघर येथील कोलवडे पोलीस ग्राउंडवरच्या हेलिपॅडवर शिंदेंचे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांच्याकडील बॅगांची तपासणी केली. अधिकारी झडती घेत असतानाच, मुख्यमंत्री शिंदेंनी माझ्याकडे काही पैसे नाहीत, फक्त कपडे आहेत, असे त्या अधिकाऱ्यांना सांगितले. युरीन पॉट मात्र नाही, असा टोलाही शिंदें यांनी यावेळी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
बॅगांची तपासणी केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आता निवडणूक आयोगाचे नियम आहेत. त्याप्रमाणे त्यांनी बॅग तपासणी केली. त्यांचे कर्तव्य त्यांनी केले. माझ्या बॅगमध्ये पैसै नाहीत, दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत. युरीन पॉट नाहीत, असं ते यावेळी म्हणाले. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. त्यांची काय चूक आहे. ते कर्मचारी आहेत. त्यांच्यावर काय राग काढायचा. महायुतीच्या सर्व कामामुळं, जे वातावरण लाडक्या बहिणींनी निर्माण केले आहे; त्यामुळे हे बिथरले आहेत. जाऊ दे मला काही बोलायचं नाही, असं बोलत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.