सिंधुदुर्ग : सोमवारी मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५ फुटांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्यभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेनंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होत. त्यांनी थेट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यलय फोडलं होतं. याच प्रकरणी आता वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जिल्हा प्रवक्ते मंदार केणी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करत असताना वैभव नाईक यांचा व्हिडिओही समोर आला होता. या व्हिडिओमध्ये आमदार वैभव नाईक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यलयात बॅट घेऊन शिरताना दिसत आहेत. याच बॅटने त्यांनी संतापात तोडफोड केल्याचं पाहायला मिळालं होतं.
दरम्यान, आज वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत म्हटलं की, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये सुद्धा भ्रष्टाचार करत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक अरबी समुद्रामध्ये होणार, असं दहा वर्षे झाली सांगत आहेत. महाराष्ट्रातील जनता त्यांची हंडी फोडल्याशिवाय राहणार नाही.” तसेच शिवरायांचा पुतळा कोसळणं हा अपघात असं मंत्री दीपक केसरकर म्हणाले होते. यावर बोलताना ते म्हणाले की, दीपक केसरकर यांचं वक्तव्य अत्यंत अशोभनीय असे आहे.