रायगड: जिल्ह्यातील उलवे येथे एका कॅब चालकाची हातोड्याने हल्ला करत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. रिया सरकन्यासिंग (वय 19) व विशाल शिंदे (वय 21) असे गुन्हेगारांचे नाव आहे. तर संजय पांडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रियाची इन्स्टाग्रामवरून नाशिकच्या विशाल शिंदे (वय 21) याच्यासोबत ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर ती नुकतीच नाशिकला गेली होती. परंतु, तिने पुन्हा एकदा आपल्याकडे राहायला यावे, असा संजय पांडे (वय 44) याचा आग्रह होता. त्यामुळे तो नाशिकला जाऊन 31 मार्चला दोघांनाही सोबत घेऊन आला. त्यानंतर 1 एप्रिलच्या रात्री संजयच्या घरात त्या दोघांचे खासगी व्हिडिओ संजयने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते. यावरून तो आपल्याकडे शरीरसुखाची मागणी करत होता, असा रियाने आरोप केला. त्यामुळे संजयची हत्या करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय?
उलवेतील मोहोळ गावात राहणाऱ्या आणि कॅबचालक असलेल्या संजय पांडे (वय 44) याचा त्याच्याच घरात मृतदेह पोलिसांना तीन दिवसांनी सापडला होता. कॅब चालक संजय अविवाहित होता, काही महिन्यांपूर्वी त्याच्या कॅबमधून मूळच्या हरियाणाच्या रिया सरकन्यासिंग (वय 19) हिने प्रवास केला होता. यादरम्यान तिने आपण नोकरीच्या शोधात असून, निराश्रित असल्याचे संजयला सांगितलं. त्यानंतर संजयने तिला पनवेलमध्ये नोकरी मिळवून दिली. तसेच तिला स्वतःच्याच घरात आश्रय दिला होता. तेव्हापासून दोघेही एकाच घरात राहत होते.
यादरम्यान, संजय पांडेच्या (वय 44) डोक्यात हातोडीचे घाव घालून हत्या करून दोन्ही आरोपींनी पळ काढला होता. यावेळी त्यांनी त्याचा मोबाइल व कॅब देखील सोबत नेली होती. परंतु, कार चालवता येत नसल्याने दोन दिवसांनी विशालकडून पुण्यात एक अपघात झाला. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांच्या कारवरील नंबरवरून गाडी मालकाला संपर्क साधून त्याचा फोटो पाठवला. त्यानंतर फोटोत असणारी व्यक्ती संजय नसून दुसराच कोणीतरी असल्याचे कॅब मालकाच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी संजयच्या भावाला कळवलं आणि उलवे पोलिसांकडे संजय पांडे (वय 44) बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर त्याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. तेंव्हा त्याचा मृतदेह आढळून आला त्यानंतर दोघांनीही नाशिकमध्ये स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले अशी माहिती समोर आली आहे.