सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असताना, आमदार निलेश राणे (MLA Nilesh Rane) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची मोठी माहिती समोर आली आहे. मालवण पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर बेकायदेशीररित्या घरात घुसल्याप्रकरणी कारवाई केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश राणे यांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांच्या घरावर धाड टाकली होती. या कारवाईदरम्यान तब्बल 25 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आल्यानंतर परिसरात तसेच राजकीय पातळीवर खळबळ माजली होती.
या घटनेनंतर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद अधिक चिघळला. निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांवरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनीही आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. परिणामी, कोकणातील राजकारणात दोन्ही राणे बंधू आता एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र आहे.
या प्रकरणामुळे आगामी राजकीय घडामोडींमध्ये आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






