नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एका लोकसभा जागेसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार यावेळी नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवर केंद्रीय मंत्री राणे यांचा सामना खासदार विनायक राऊत यांच्याशी होणार आहे. विनायक या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. आतापर्यंत भाजपने या जागेवरून निवडणूक लढवली नाही. राणे यांचे पुत्र नीलेश राणे यांनी 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर ही जागा जिंकली होती.
नारायण राणेंचा राजकीय प्रवास
नारायण राणेंनी 2005 मध्ये शिवसेनेविरोधात बंडखोरी केली होती. मात्र, राणेंचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला. 1968 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी नारायण राणे यांनी युवकांना शिवसेनेशी जोडण्यास सुरुवात केली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर नारायण राणे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच गेली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही नारायण राणे यांची तरुणांमध्ये प्रसिद्धी पाहून प्रभावित झाले होते. त्यांच्या संघटन क्षमतेमुळे ते चेंबूरमधील शिवसेनेचे शाखाप्रमुख झाले.