नवी मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा सुरू आहे. सभा घेऊन ते मतदारांना आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रणशिंग फुंकले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जाहीर केल्याचा दावा गीते यांनी केला. महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप घोषित झालेले नाही. त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्याकडून रायगडमधून उमेदवाराची घोषणा करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
रमाधाम वृद्धाश्रमाच्या बैठकीसाठी अनंत गीते आले होते. या बैठकीला संपूर्ण महाराष्ट्रातून पदाधिकारी, आमदार हजर राहणार असल्याची माहिती गीते यांनी दिली. बैठकीपूर्वी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. गीते म्हणाले, “रायगड लोकसभेतून मला उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मी रायगड लोकसभा लढवणार आहे. आता रायगडचा खासदार ठाकरे गटाचा होणार,” असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. बैठकीत इतर विषयांवर चर्चा होईल. कोकण पदवीधर मतदारसंघाचा उमेदवार उद्धव ठाकरे उद्या जाहीर करतील, असेही गीते यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करत आहेत. त्यामुळे त्यांना टक्कर देण्यासाठी गीते मैदानात उतरणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, त्यामध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर गीते राजकारणात सक्रिय नव्हते. पण आता ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यानुसार, खेड, दापोली आणि मंडणगडमध्ये त्यांनी मेळावे, विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्याची सुरवात केली आहे.
दरम्यान, यावेळी अनंत गीते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याबाबतही भाष्य केलं. “मावळमधून खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करेल”, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.