शहापूर: शहापूर तालुक्यातील किन्हवली पोलीस ठाण्याच्या हद्यीत शहा विद्यालयाच्या संचालकाविरुद्ध कारवाई केल्यानंतर अवघ्या ४ दिवसांच्या अंतराने सलग दुसऱ्यांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाडसी कारवाई केली आहे. वेहळोली (बु.) येथील तलाठी ज्ञानेश्वर शिसोदे याने कामास ठेवलेल्या खाजगी व्यक्ती अशोक वरकुटे याच्या मार्फत ८ लाख रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना वरकुटे यास अटक करण्यात आली असून तलाठी ज्ञानेश्वर शिसोदे मात्र फरार झाला आहे.
त्यास ताब्यात घेण्यासाठी शोध सुरु आहे. तक्रारदार हे काम करत असलेल्या कंपनीच्या मालकांनी सर्वे नं २६७/बी अशी शेणवे गाव येथे पाच एकर जमीन खरेदी केली असून या जमिनीचे फेरफार मंजुर करुन सातबारा जागा मालकाचे नाव नोंदविण्याची प्रक्रिया करण्यासाठी जागामालक यांनी तक्रारदार यांना अधिकारपत्र दिलेले होते. जागामालकाच्या नावे फेरफार मंजुर करुन सातबारावर नाव नोंदविण्याचा अर्ज सुमारे १० महिन्यांपासून प्रलंबित आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे याने वेहळोली (बु.) तलाठी कार्यालयात काम करणारा खाजगी व्यक्ती अशोक दत्तात्रय वरकुटे यांच्या मार्फत ५ लाखांच्या लाचेची मागणी केली असल्याची तकार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय पालघर यांच्याकडे देण्यात आली होती.
त्यानुसार पडताळणी केली असता तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे याने खाजगी व्यक्ती अशोक वरकुटे यांच्या मार्फत तक्रारदार यांच्या फेरफार नोंदणीच्या अर्जामध्ये त्रुटी काढून अर्ज रद्द न करता फेरफार मंजुर करण्याकरता ८ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याचे पडताळणी कार्यवाहीमध्ये निष्पन्न झाले. त्यानंतर गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये खाजगी व्यक्ती अशोक वरकुटे याला तलाठी ज्ञानेश्वर सिसोदे यांच्यावतीने ८ लाख रुपये ज्यामध्ये २ लाख रुपयांच्या भारतीय चलनी नोटा व ६ लाख रुपयांच्या नकली खेळण्यातील नोटा स्वीकारतांना लाचेच्या रक्कमेसह अटक केली. तर तलाठी फरार असून त्याचा शोध सुरु आहे.