रायगड : रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. कर्जत येथील मुद्रे भागात एका ४५ वर्षीय बापाने स्वतःच्याच १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या आरोपीला कर्जत पोलिसांनी तातडीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत शहरातील मुद्रे भागात आरोपी रमेशसिंग परिहार (वय ४५ वर्ष) हा आपल्या कुटुंबासह राहतो. पीडित मुलगी १३ वर्षांची असून ती घरात गाढ झोपलेली असताना, या नराधम बापाने रात्रीच्या वेळी तिच्या खोलीत प्रवेश केला. विकृतीची परिसीमा गाठत आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार करत ओरडण्याचा प्रयत्न केला असता, नराधमाने तिचे तोंड दाबून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पीडित मुलीने हिंमत न हारता स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ‘मम्मी मम्मी’ असा आरडाओरजा केला. मुलीचा आवाज ऐकून तिची आई तातडीने जागी झाली. समोर चाललेला भयानक प्रकार पाहून आईने तात्काळ पतीला बाजूला ढकलले आणि आपल्या मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले. पत्नीचा संताप पाहून आरोपी पतीने घरातून पळ काढला.
या घटनेनंतर पीडितेच्या आईने तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपास सुरू केला. गुन्हा घडल्यापासून आरोपी दोन दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र, कर्जत पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून अखेर या नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा विकृत मानसिकतेच्या नराधमाला कायद्याने कठोरतम शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.







