रायगड : रायगडमध्ये ५७ प्रवाशांना घेऊन सहलीला निघालेली बस ताम्हिणी घाटात उलटल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ५५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह बचावपथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्याहून कोकणाकडे जात असताना हा अपघात घडला आहे. अपघातग्रस्त खासगी बस पुण्याहून कोकणाकडे सहलीसाठी निघाली होती. या बसमधून ५७ प्रवासी प्रवास करत होते. शनिवारी पहाटे बस माणगाव ते पुणे दरम्यानच्या ताम्हिणी घाटात आली असता, अवघड वळणावर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस घाटात उलटली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ५५ प्रवासी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनीही घटनास्थळाकडे धाव घेतली. माणगाव इथून बचाव पथके, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून परिसरातील नागरिकही बचावकार्यास धावले. अपघातातील मृतांची नावे अद्यापही समोर आलेली नाही. जखमी प्रवाशांना माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.