ठाणे : दहिसर परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीला आली आहे. अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी येथील एका अल्पवयीन (वय १२) मुलाचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याचा निर्घृण खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
मृत मुलाच्या आईने शिळ डायघर पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली. हा मुलगा २५ मार्च रोजी घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ झाला तरी तो घरी न परतल्याने महिलेने मुलाचा शोध घेतला; परंतु तो सापडला नाही. अखेर महिलेने पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फीरवली. त्यावेळी संबंधित मुलगा नवी मुंबई परिसरातील तळोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत आढळला. एका पाण्याच्या डबक्यात या मुलाला त्याचे हात-पाय बांधून टाकून देण्यात आले होते. आडीवली-किरवली गावाच्या हद्दीत मुलाचा मृतदेह आढळला.
या मुलाची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी वेगवेगळी पथके स्थापन करून तपास चालू केला. या प्रकरणी पोलिसांनी रमजान मोहम्मद कुद्दूस शेख आणि मोहम्मद आझाद कुद्दुस शेख या दोन आरोपींना अटक केली. तपासादरम्यान या दोन्ही आरोपींनी आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमजान शेख आणि मृत मुलगा ठाकुरपाडा येथे एकाच परिसरात राहायचे. रमजान मृत मुलाला प्रलोभन दाखवून निर्जन स्थळी घेऊन गेला. तेथे आरोपींनी मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाने विरोध केल्यामुळे आरोपीने त्याच्या डोक्यात दगड मारून त्याला बेशुद्ध केले आणि कपड्याने त्याचा गळा आवळला. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला.
रमजान शेख याने त्याचा भाऊ मोहम्मद शेख याला मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी बोलावले. दोघांनीही मुलाचे हात-पाय बांधून त्याला पाण्याच्या डबक्यात फेकून दिले. या गुन्ह्याचा शोध पोलीस घेत आहेत.