सोलापूर : नव्याने निर्माण झालेल्या केगाव ते विजापूर रोड या राष्ट्रीय महामार्गावर देशमुख वस्ती परिसरात भेदरलेल्या काळविटांनी उड्डाणपुलावरून उड्या मारल्या आणि त्यात जबर मार लागल्याने ११ काळविटांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. तर ३ काळविटं जखमी झाली आहेत. शनिवारी (ता. २८) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर देशमुख वस्तीनजीक उड्डाणपूल आहे. या भागात हरणांसह, काळवीट व इतर वन्य प्राण्यांच्या व कळपांचा नेहमीच वावर असतो. आसपासचा बहुतांशी परिसर सपाट आणि तुलनेत कमी वर्दळीचा आहे. हरीण व काळविटांचे कळप राष्ट्रीय महामार्गावर येतात आणि रस्ता ओलांडून पुढे जातात.
असाच एक काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली पडला आहे. ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेती माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत जवळपास ११ काळविटांचा या घटनेत मृत्यू झाला तर ३ काळविटं जखमी झाली आहेत.
उड्डाणपुलावरून पुढे पळताना काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली कोसळतो आणि त्यांचे जीव जातात. असे प्रकार नेहमीच घडतात, असे केगाव परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत सोलापूर वन विभागाचे प्रमुख, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील म्हणाले, “या भागातून नेहमीच काळविटं आणि इतर प्राणी रस्ता ओलांडत असतात. वाहनांच्या आवाजाने घाबरून काळविटांनी उड्डाणपुलावरून उड्या मारल्याची शक्यता वर्तवली आहे.
घटनेच्या वेळी अचानक वाहन समोर आल्याने काळविटांच्या कळपाने पुलावरून उडी मारली असेल आणि एकाच वेळी त्यांचा मृत्यू झाला असेल’ असा अंदाज यांनी वर्तवला आहे.