पुणे : ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’, या गाण्याला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून मान्यता मिळाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारी २०२३ पासून हे गीत लागू करण्यात येणार आहे. सांस्कृतीक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही घोषणा केली असल्याची माहिती आहे.
मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (ता. ३१) पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. तसेच यावेळी ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’या गीताला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्यात आले आहे.
गाण्याचे बोल
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा …
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा