कोल्हापूर : आदित्य ठाकरे यांना काँग्रेसची लोकं जवळची वाटतात. त्यांना आपली माणसे नको झाली आहेत. आम्ही परत येतो, पण दोन्ही काँग्रेसलाला सोडा असं म्हणत होतो. पण आम्हाला उद्धव ठाकरे यांनी तुम्ही देखील निघून जा म्हटलं होतं, त्यामुळे राष्ट्रवादीची ‘शिवसेना’ झाली हे काही चुकीचं नाही, असा टोला शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगावला.
विधिमंडळ अधिवेशन नागपूर येथे सुरु आहे. त्यातील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा या दरम्यानचा एका व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात ‘आमची शिवसेना, राष्ट्रवादीची शिवसेना’ असे जयंत पाटील म्हणत असून त्याला ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव हे मान डोलवत सहमती दर्शवत आहेत.
त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम असल्याची चर्चा रंगत असताना, दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा तोंडसुख घेतले.
खोके घेणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावर देखील केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर देताना ‘जे खोके घेऊन तुरुंगात जाऊन आलेत, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसतो, ते केवळ ठोकशाहीची भाषा करतात.
आमदार कधीही पैशासाठी फुटत नाहीत, पैशापेक्षा आमदारकी मोठी आहे. जे चार वेळा निवडून आले ते पैशासाठी फुटतील काय?, असा सवालच केसरकर यांनी राऊत यांना विचारला आहे.