पुणे : रेल्वे प्रवासात स्टेशनवर खाद्यपदार्थ विकत घ्यायचे म्हंटले की अंगावर काटा येतो. अनेक ठिकाणी चांगले सकस, ताजे अन्न मिळेल याची शाश्वती नसते. अशातच मेल-एक्सप्रेस गाड्यांमधील खाद्यपदार्थांच्या दर्जात आणखी सुधारणा व्हावी, या उद्देशाने भारतीय रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)ने महत्त्वाची घोषणी केली आहे. IRCTC च्या वतीने देशभर एक हजार समूह स्वयंपाकगृहे (क्लस्ट किचन) उभारण्यात येत आहे.
दुरांतो एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस यांसारख्या मेल तसेच अन्य काही लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांत खाद्यपदार्थ पुरविण्यात येणार आहे. मुंबईतील कुर्ला, कॉटन ग्रीन, चेंबूर, ठाणे, पनवेल येथे अशा प्रकारची क्लस्टर किचन्स सुरु करण्यात आली आहेत. या किचन्समधील खादयपदार्थ इस्लुलेटेड (हवाबंद) गाडीमधून रेल्वे स्थानकांपर्यत पोहोचवले जात आहेत.
दर्जा राखण्यासाठी IRCTC ने काही नियम ठरवले आहेत. यामध्ये स्वयंपाकगृहावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच, बेस किचन ते स्टेशनपर्यंत वाहतुकीसाठी हवा बंद किंवा वातानुकूलित फूड व्हॅनचा वापर केला जाणार आहे. वेळोवेळी कीटक नियंत्रण, स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच, शिजवलेल्या अन्नाच्या नमुन्यांची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. ब्रेड, लोणी, दही इत्यादी बंद पाकिटामधील खाद्यपदार्थांची अंतिम मुदत तपासून वापर करण्यात येणार आहे.
दरम्यान, IRCTC ने स्वयंपाक तयार करण्यासाठी काही अटी व नियम लागू केले आहेत. म्हणून नव्या किचनमधून दर्जेदार खाद्यपदार्थ पुरवण्यात येतात. यामुळे खाद्यपदार्थांबद्दल तक्रारींचे प्रमाण 50 टक्क्यांनी घटल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.