पुणे : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागला आहे. अखेर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगत तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज शुक्रवारी (दि.04) सकाळी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आपली भुमिका मांडली. ते बोलताना पुढे म्हणाले, इंदापूर तालुका स्वाभिमानी आणि अन्याय सहन न करणारा आहे. आज आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काल शुक्रवारी शरद पवार यांनी मला बोलावले होते. सिल्व्हर ओकला आमची बैठक झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जेवढा संघर्ष केला आहे त्या कार्यकर्त्यांसाठी मी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी बोलताना सांगितलं.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, शरद पवारांची भेट घेण्याअगोदर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. दीड दोन तास माझी सविस्तर चर्चा झाली. कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी जेवढा संघर्ष केला आहे त्या कार्यकर्त्यांसाठी मी हा निर्णय घेत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी काल शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे पुत्र आणि कन्येने व्हाट्सअप स्टेटसला तुतारी चिन्ह ठेवले होते. त्यामुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे जवळपास निश्चित झाले होते. अशातच आता स्वत: हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली.