पंढरपूर : पंढरपूर येथे एसटी महामंडळाच्या जागेवर राज्यातील पहिले 34 फलाटाचे अति- भव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक व त्याला जोडूनच एक हजार यात्रेकरू एकावेळी राहतील, अशा यात्री निवासाचे लोकार्पण आषाढी एकादशी दिवशी (17 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहे.
पंढरपूर येथे आषाढी आणि कार्तिकी सारख्या मोठ्या यात्रेसाठी अद्ययावत असलेले बसस्थानक अपुरे पडत होते. म्हणून एसटी महामंडळाकडून 11 हेक्टर जागेवर 34 फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक तयार केले आहे. तसेच पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंची निवासाची सोय व्हावी, यासाठी बस स्थानकाला लागूनच यात्री निवासाची सोय केली आहे. या यात्री निवासामध्ये एकाच वेळी सुमारे 1हजार यात्रेकरू राहू शकतील, अशी सोय करण्यात आली आहे.
या यात्री निवासामध्ये एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी दोन सुसज्ज उपहारगृहे बांधण्यात आली आहेत. हा राज्यातील एसटी महामंडळाचा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी 33 कोटी रुपये खर्च करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. येथे एसटीच्या सुमारे 500 कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय करण्यात आली. याबरोबरच सुमारे 1 हजार यात्रेकरू देखील राहतील, असे भव्य यात्री निवास बांधण्यात आले आहे.