पुणे : राज्यात अपघातात वाहन चालक तसेच दुचाकीवरील सहप्रवासी यांच्या मृत्यु तसेच जखमींच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. हेल्मेट सक्ती असताना देखील अनेक वाहन चालक तसेच सहप्रवासी देखील हेल्मेट परिधान करत नाहीत. त्यामुळे आता विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई होणार आहे. हे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर हा आदेश लगेचच काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती. मात्र, आता सहप्रवाशांवर देखील कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलीसांच्या ई-चलन मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे. केवळ सहप्रवाशांवर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
महामार्गाचे जाळे सर्वत्र विस्तारल्यानंतर वाहनांचा वेग वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील मागील 5 वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता विनाहेल्मेट दुचाकीस्वार व सहप्रवाशांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यासोबतच वाहतूक पोलीसांकडून मोटार वाहन कायदा 1988 त्या तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट चालकांसह सहप्रवाशांविरुद्ध प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे विनाहेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर कारवाईचे आदेश काढण्यात आले आहे. परंतु या आदेशाची कधीपासून अंमलबजावणी होणार याबाबत निश्चित तारीख जाहीर केलेली नाहीयेय.
पुण्यात सरासरी दररोज अशा प्रकारे ४ हजार चालकांवर कारवाई केली जाते. त्याचा दंड अनेक वाहनचालक भरत नाही. त्यामुळे लोकअदालतीत या सर्व केसेस ठेवण्यात येतात. ज्याचे वाहन चालकांना कळविले जाते. तेव्हा बहुतेक वाहनचालक दंड भरतात. आता सहप्रवाशांवर दंड लागू केल्यास त्याचाही दंड वाहन चालकांनाच भरावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद होण्याची शक्यता आहे.