पुणे : राज्यातील काही भागात पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाटमाथ्यावरील भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पुढील तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्राच्या उत्तर भागापासून उत्तर केरळ दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ज्यामुळे अरबी समुद्रातील बाष्पयुक्त हवा वेगाने किनारपट्टीच्या दिशेने वाहत आहे. परिणामी किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापुरसह सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाट क्षेत्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
आज मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यत: आकाश ढगाळ राहील आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. इथे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 अंश सेल्सिअस आणि 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असेल. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.