बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात चिखली-देऊळगाव राजा रोडवरील रामनगर फाट्यावर भीषण अपघात घडला आहे. एसटी बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक झाली आहे. या अपघातात बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातग्रस्त बस पुण्यावरून शेगावला जात होती. या बसमधून २० ते २२ प्रवासी प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटे बस चिखली-देऊळगावराजा मार्गावरील रामनगर फाट्याजवळ आली असता, चालकाने समोर जात असलेल्या खासगी बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या मालवाहू ट्रकने बसला जोराची धडक दिली.
या धडकेत बसच्या समोरील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. या घटनेत बसमधील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत झालेला प्रवासी खामगाव येथील रहिवासी आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. याप्रकरणी चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.