पुणे : राज्यातील सर्वच खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाय दूध दरात वाढ केली आहे. त्यात आता गोकुळ दूध संघाने गाईच्या दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. दुधाची ही दरवाढ फक्त पुणे आणि मुंबई या ठिकाणीच असणार आहे. 1 जुलैपासून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ केली आहे.
राज्यातील सर्वच दूध संघांनी दरवाढ केल्यानंतर गोकुळ दूध संघाने ही दरवाढ करावी, अशी चर्चा संचालक मंडळाच्या बैठकीत झाली होती. त्यानुसार गुरुवार (दि.04) कालपासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. दरम्यान, दरवाढीमुळे दूध विक्रीवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत आहे. पूर्वीप्रमाणे दूध विक्री सुरु असून आणखी दुधाला मागणी वाढण्याची शक्यता आहे.
पुणे आणि मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये विक्री दरात कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याची माहिती गोकुळ दूध संघाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या दूध दरवाढीचा ताण मुंबई आणि पुणेकरांना पडणार आहे. त्यामुळे, पूर्वी प्रतिलीटर गाय दूध 54 रुपयेला विक्री होत होते. आजपासून हेच दूध दर 56 रुपये झाला असल्याचे परिपत्रक काढले आहे.
गोकुळ दूध संघाच्या गाईच्या दुधाला पुणे आणि मुंबईमध्ये मोठी मागणी आहे. गोकुळच्या गाय दुधाची मुंबईमध्ये तीन लाख लिटर आणि पुण्यात 40 हजार लिटरची विक्री होते. दूध पावडर विक्रीमध्ये तोटा सहन करणा-या संघांना या दरवाढीमुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.