परंडा (धाराशिव) : परंडा तालुक्यातील भोत्रा येथील मूळ निवासी माजी आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांची बुधवारी रात्री प्राणज्योत मालवली. लंग्ज इन्फेक्शन झाल्यामुळे माजी आमदार पाटील यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु बुधवारी रात्री 10.27 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील हे अत्यंत हालाखीची परिस्थितीतून वर आले होते. त्यांनी तारुण्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवर चालक म्हणून काम केले होते. याच काळात बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत कार्यरत झाले. संघटनेत विविध पदे भुषवित असताना त्यांना 1995 व 1999 साली विधानसभेवर मतदारांनी निवडून दिले. तत्पूर्वी ते बिनविरोध नगरसेवक म्हणूनही निवडून आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच परंडा मतदारसंघात शोककळा पसरली आहे.
माजी आमदार पाटील यांचे पार्थिव सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. भोत्रा रोडच्या शेतामध्ये त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.