पुणे : बारावीचे परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी आधीच्या वेळापत्रकानुसार 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली होती. आता 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह, तर 15 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबद्दलची माहिती दिली आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एकूण 9 विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. यात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात परीक्षा होणार आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रवारी तर दहावीची परीक्षा 21 फेब्रवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे.
कुठे भरायचे अर्ज?
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल प्रणालीद्वारे ऑनलाइन भरायचे आहेत, असं शिक्षण मंडळाने सांगितलं आहे. त्याचप्रमाणे व्यवसाय अभ्यासक्रम घेणारे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थी, खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि काही विषय घेऊन परीक्षा देणारऱ्या विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज भरावे लागतील. तसेच आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्जही कनिष्ठ महाविद्यालयातर्फे भरायचे आहेत.