लहू चव्हाण
पाचगणी, (सातारा) : शहर व परिसरातील सर्वात मोठा असलेल्या श्री घाटजाई-काळेश्वरी देवीच्या उत्सवाला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी तसेच या काळात यात्रा उत्सव नागरिकांनी मोठ्या शांततेत पार पाडावा असे आवाहन पाचगणी पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी केले आहे.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) ग्रामपंचायत हद्दीतील व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री घाटजाई-काळेश्वरी देवींची यात्रा १५ व १६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यात्रा उत्सव योग्य रित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीच्या बैठकीचे आयोजन नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात करण्यात आले होते. यावेळी राजेश माने बोलत होते.
यावेळी नायब तहसिलदार चंद्रकांत पारवे, सहायक पोलीस निरीक्षक यशवंत महामुलकर, अरविंद माने, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक दिलिप रनदिवे यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष नानासाहेब कासुर्डे, माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे, अजित कासुर्डे, शरद कासुर्डे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, आरोग्य विभाग व महावितरण कार्यालयाचे प्रतिनिधी व मान्यवर उपस्थित होते.
यापुढे बोलताना माने म्हणाले, “यात्रा उत्सव कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. यात्रा उत्सव शांततेत पार पडेल या करिता संपुर्ण उत्सव कालावधीत कार्यक्रम ठिकाणी कमिटीचे अध्यक्ष सदस्य यांनी उपस्थित राहवुन कार्यक्रम शांततेत पार पडेल तसेच कोणत्याही प्रकारचा भांडणतंटा होणार नाही यांची दक्षता घ्यावी.”
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिका यांचे मार्फत रस्त्यांची व गटारांची दुरुस्ती करणेबाबत त्याचबरोबर महावितरण यांना यात्रा उत्सव कालावधीत विद्युत पुरवठा व पाणी पुरवठा, सुरळीत चालू राहील तसेच प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रामार्फत यात्रा उत्सव कालावधीत एक स्वतंत्र युनिट तयार करून ते यात्रा कालावधीत कायमस्वरूपी उपलब्ध होतील असाहि निर्णय या बैठकीत घेण्यात आला.