Election पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु केली आहे. निवडणूकीने भरावयाची एकूण ४ हजार ५९० पदे असून ३२ हजार ५५९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली असल्याची माहिती प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी दिली आहे.
३२ हजार ५५९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त…!
नामनिर्देशन प्रक्रिया सुरु झालेल्या २५५ कृषि उत्पन्न बाजार समित्या आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार २७ मार्च ते ३ एप्रिल २०२३ या कालावधीत इच्छूक व्यक्तींकडून नामनिर्देशन पत्रे मागविण्यात आली होती. या मुदतीमध्ये ३२ हजार ५५९ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत.
या कार्यक्रमानुसार सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये २ हजार ८०५ पदे भरावयाची असून त्यासाठी १९ हजार ५१८ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहेत. ग्रामपंचायतींच्या मतदार संघात १ हजार २० पदे असून ९ हजार १८९ नामनिर्देशन पत्रे, व्यापारी/अडते मतदार संघात ५१० पदांसाठी २ हजार ५६६ नामनिर्देशन पत्र व हमाल/तोलारी मतदार संघामध्ये २५५ पदांसाठी १ हजार २८६ नामनिर्देशन पत्रे प्राप्त झाली आहेत, असेही प्राधिकरणाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.