पुणे : उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितादरम्यान मतदान सुरु असताना सांयकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला पत्रकार परिषद घेतली होती. मतदानादिवशी पत्रकार परिषद घेणं उद्धव ठाकरे यांना भोवणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
यावर उध्दव ठाकरे यांनी आचार संहितेचा भंग केल्याचे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने, राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजपच्या तक्रारीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहले होते. या पत्रात राज्य निवडणूक आयोगाला नेमकं त्यादिवशी पत्रकार परिषदेत काय झाले याची माहिती मागवली होती. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने तपासणी करून पत्रकार परिषदेचा संपूर्ण मसुदा इंग्रजीत भाषांतर करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे हे मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. तसेच मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. पण निवडणूक यंत्रणा कमी पडली. निवडणूक आयोगाकडून मुद्दाम ज्या ठिकाणी ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त मतदान होऊ शकतं तिथे मतदानासाठी मुद्दाम जास्त वेळ लावला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. निवडणूक आयोगाच्या दिरंगाईमुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. अखेर कंटाळून अनेक मतदारांनी रांगेतून बाहेर पडत मतदान न करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.