मुंबई Eknath Shinde News : अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. (Eknath Shinde News) सामाजिक सलोखा राखला जाईल, कुणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेऊन सामाजिक सलोखा ठेवण्यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. (Eknath Shinde News)
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पाहणी केली
अकोला आणि शेवगाव येथे झालेल्या दंगलींनंतर या दोन्ही ठिकाणी परिस्थिती आता नियंत्रणात असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून येथे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी अकोला येथे तर शेवगाव येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.
जातीय दंगली रोखण्यासाठी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने जातीय दंगली घडणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
कायदा हातात घेऊन जातीय द्वेष पसरवून सामाजिक सलोखा धोक्यात आणणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणीही कायदा हातात घेऊ नका, सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट टाकताना काळजीपूर्वक आणि जबाबदारीने टाका, आपण केलेल्या पोस्टमुळे सामाजिक तणाव निर्माण होणार नाही आणि कुणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले आहे.