सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वलसंगकर यांनी आत्महत्या केल्याने वैद्यकीय समुदायात खळबळ उडाली आहे. कुटुंबाच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वलसंगकर यांनी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. डॉ. वलसंगकर यांच्या जवळच्या प्रियजनांनी असा आरोप केला आहे की, जवळच्या नातेवाईकाकडून त्यांना सतत तुच्छ लेखण्यात येत होते आणि त्यांचा अपमान केला जात होता. त्यांचे मजबूत व्यक्तिमत्व आणि व्यावसायिक यश असूनही, डॉ. वलसंगकर यांना शारीरिक आणि मानसिक छळाचा सामना करावा लागत होता. डॉ. वळसंगकर यांच्यावर नातेवाईकाने वयाने लहान असूनही तीन वेळा हात उचलला होता. नातेवाईक जवळचा असला तरी त्याने सार्वजनिक ठिकाणी अपमान करून डॉ. वलसंगकर यांचे मानसिक खच्चीकारण केले होते. ज्यामुळे मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या मानसिक छळाला कंटाळून अखेर डॉ. वलसंगकर यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे.
अटकेत असलेल्या मनीषा माने यांना डॉ. वलसंगकर यांचा अपमान करणाऱ्या नातेवाईकाने प्रशासकीय पदावर पोहचवले होते. त्या देखील त्याच नातेवाईकाच्या हातातील प्यादे होते.
आत्महत्येच्या अगोदरच्या दोन दिवसाआधी डॉ. वळसंगकर यांनी विश्वासू मित्राशी फोनवर मन मोकळे केले होते. दोघात झालेल्या संभाषणात होत असलेला मानसिक त्रास, ताण, कर्मचारी सोडून जाणं आणि सततचा मानसिक छळ झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि पुरावे गोळा करण्यासाठी डॉ. वलसंगकर यांचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला आहे. कॉल रेकॉर्ड आणि चॅट्समधून त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल महत्त्वाचे पुरावे मिळू शकतात. कुटुंबातील सदस्य आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संशय असून डॉ. वलसंगकर यांच्या जवळच्या असलेल्या मनीषा मानेला ताब्यात घेण्यात आले आहे. तथापि, पोलिसांनी अद्याप तिचे आणि डॉ. वलसंगकर यांच्या मोबाईल फोनचे फॉरेन्सिक विश्लेषण केलेले नाही, ज्यामुळे या प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड होऊ शकते. तपास सुरू असून डॉ. वलसंगकर यांनी आत्महत्या का केली याचे कारण शोधण्यासाठी, गुंतागुंतीचे जाळे उलगडण्यासाठी पोलिस काम करत आहेत.