सोलापूर : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राज्यातील प्रत्येक पक्ष जोरदार तयारीला लागलेला दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर सभा घेऊ लागले आहेत. आम्ही विकासासाठी आणि कामासाठी सरकारमध्ये गेलो आहोत, पहिले अडीच वर्ष आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही होतो तेंव्हाही आम्ही आमची विचारधारा सोडली नाही. आज मी महायुतीमध्ये असलो तरी सेक्युलर विचार सोडला नाही. मी सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करतो, मात्र काही जण माझी टिंगल टवाळी करतात. मात्र, मी त्याकडे फार लक्ष देत नाही. असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या मोहोळमधील जाहीर सभेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
‘आम्ही मजा करायला आणि मिरवणूका काढून जल्लोष करायला येत नाही. वा कधी चुनावी जुमला केला नाही, 2004 निवडणूकीच्या आधी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते तेंव्हा मी नवखा होतो. तेंव्हा शेतकऱ्यांना वीज बिल माफी करायची असं जाहीरनाम्यात म्हटलं गेलं, शेतकऱ्यांची मत घेऊन आम्ही सत्तेवर आलो, त्यानंतर काँग्रेसने विलासराव यांना मुख्यमंत्री केले, लोकांनी वीज बिल माफिच्या नावाने मत दिली. तेंव्हा लोक तोंडात शेण घालतील असं मी म्हटलं होतं, मात्र विलासराव ते सुशीलकुमार शिंदे यांचा निर्णय होता असं म्हणाले.”
‘हा’ अजित दादाचा वादा आहे..
“इथे आलेल्या माझ्या माय माऊली काय देखण्या दिसतायत फोटो काढून घेतला पाहिजे. हे सगळ्यांना मिळत नाही, आपल्या बापजाद्यांनी कांही तरी कराव लागत. तेंव्हा हे माय माऊलींचे प्रेम मिळते. अडीच लाखाच्या आतलं तुमचं उत्पन्न असेल तर उरलेल्या माय माऊलींच्या खात्यात ही पैसे जमा होतील, हा अजित दादाचा वादा आहे. मी इतके वर्ष सरकारमध्ये आहे पण आम्ही कांही केल नव्हतं, मोठ्यांच्या पोटी आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन येणाऱ्याला काय कळणार. 1500 रुपयाची किंमत,” असा टोलाही अजित पवारांनी यावेळी लगावला.
शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही..
“आज कुठल्याही एका पक्षाचे सरकार सत्तेवर येऊ शकत नाही, 1985 ला फक्त वसंत दादांचे सरकार आले मात्र त्यानंतर कधीही बहुमत मिळाले नाही. आलेले पैसे स्वतः करता खर्च करा,नेहमी स्वतः च्या आवडीला मुरड घातली मात्र इथून पुढे महाराष्ट्र सरकार 46 हजार कोटी माय माऊलींसाठी खर्च करणार आहे. यातून अर्थचक्र वाढणार असून आर्थिक सुबत्ता यायला मदत होणार आहे. 43 लाख कोटी हे आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न आहे. त्यातून मी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला,” असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, “हा चुनावी जुमला नाही. आउटडेटेड झालेल्या योजना बंद करून चांगल्या योजना आणायच्या आहेत. जरी मी मुंबईला राहतो असलो तरी माझी उसाची शेती, पोल्ट्री आणि दुधाची डेअरी आहे. शेतकऱ्यांनी पुढचं बिल द्यायचं नाही, आणि मागचंही ही द्यायचं नाही. पुढील 15 दिवसाच्या आत पुढचं मागच्या बिल शून्य होणार आहे. तुम्ही महायुती सरकार आणा पुढील पाच वर्ष बिल द्यावं लागणार नाही, हा दादाचा वादा आहे,” असे आवाहनही यावेळी अजित पवार यांनी केले आहे.