गणेश सुळ
केडगाव, (पुणे): राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगलाच तापला असून, राज्यभरात आंदोलने, आणि उपोषणे होत आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा बांधव आक्रमक झाले असतानाच धनगर समाजाने आक्रमक भूमिका घेत थेट शुक्रवारी (ता.८) सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळून जाहीर निषेध नोंदवला आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे दोन दिवसीय दौऱ्यासाठी सोलापुरात आले आहेत. आज त्यांच्या दौऱ्याचा दुसरा दिवस असून, ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. अशातच अनेक लोक त्यांच्या भेटीसाठी तिथे येत होते, आपले प्रश्न मांडत होते. ते लोकांची निवेदनं स्विकारत होते. अशातच धनगर आरक्षण कृती समितीच्या काही सदस्यांनी कित्येक वर्ष प्रलंबित असलेल्या धनगर आरक्षणासंदर्भातील निवेदन त्यांना देण्याची विनंती केली.
या भेटीवेळीच शेखर बंगाळे या आंदोलकाने विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा टाकला. तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे, अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या संपूर्ण प्रकारानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलकांना मारहाण करण्यात आली.
दरम्यान, धनगर समाजाला आरक्षणाचा मुद्दा अद्याप मिटलेला नसून लवकरात लवकर आरक्षण मिळावे तसेच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने केला आहे.