मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 9 दिवस होऊन गेले. यात महायुतीला दणदणीत यश मिळालं. असं असलं तरीही मुख्यमंत्र्याचा शपथविधी झालेला नाही. त्यामुळे महाराष्टाचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. अशातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं भाकीत केलं आहे. या नेत्याने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर केलं आहे. आज किंवा उद्या भाजप नेत्यांची बैठक होऊन पक्षाचा गटनेता ठरवला जाईल, असे या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर जाहीर केलं आहे.
सोमवारी किंवा मंगळवारी भाजपच्या विधीमंडळ पक्षाचा गटनेता निवडला जाईल. त्यात फडणवीसांची निवड होईल आणि तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. असे नाव न सांगण्याच्या अटीवर भाजप नेत्याने ही माहिती दिली आहे. दुसरीकडे भाजप नेते रावसाहेब दानवे यांनीही मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित झालं असून भाजपचे वरिष्ठ नेते यावर शिक्कामोर्तब करतील, अस स्पष्ट केलं होतं. ‘पुढचा मुख्यमंत्री कोण होणार?’ हे सगळ्यांना माहिती आहे. आम्ही वरिष्ठांनी या नावावर शिक्कामोर्तब करण्याची वाट पाहत आहोत, असं रावसाहेब दानवे म्हणाले होते.
दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेचा पेच सुरू असताना एकनाथ शिंदे हे आपल्या मूळ गावी गेल्याने देखील राजकीय चर्चांना उधाण आले होते. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी गावावरून परतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले की, ‘मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय घेतील. आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत.’
महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर 23 तारखेला मतमोजणी झाली. निकालामध्ये भाजपप्रणित महायुतीला 230 जागांवर यश मिळालं. तर महाविकास आघाडी केवळ 46 जागांवर अडकून पडलं. दरम्यान, राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे होणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहतील, अशी माहितीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती.