Devendra Fadanvis : पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या एका तरुणीवर माथेपिरू तरुणीने कोयत्याने हल्ला केला. या वेळी स्वतःचा जीव धोक्यात घालून लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरूणांनी धाडसाने तिला वाचवले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोनवरून या तरूणांच्या धाडसाचे कौतुक केले. भाजपा आमदार व पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या फोनवरून त्यांनी लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील यांच्याशी संवाद साधला. यावेळी जवळगे यानेही आपली भावना व्यक्त केली. (Devendra Fadanvis)
दरम्यान, कोयत्याने झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून तरूणीला वाचवल्याबद्दल लवलेश जवळगे आणि हर्षद पाटील यांचं कौतुक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस यांनी प्रथम हर्षद पाटीलशी संवाद साधला. हर्षदने फडणवीस यांचे धन्यवाद व्यक्त केले व फोन लवलेश जवळगे याच्याकडे दिला.
त्यानंतर फडणवीस लवलेश जवळगे याच्याशी बोलले. फडणवीस सरांचा फोन आल्याने मला आनंद झाला, अशी भावना जवळगे याने व्यक्त केली. तुम्ही फोन करून आमची दखल घेतली, आमच्याशी संवाद साधला, यामुळे मला छान वाटत आहे, अशी प्रतिक्रीया जवळगे याने व्यक्त केले.
माथेपिरू तरूण कोयता हातात घेऊन तरूणीवर हल्ला करण्यासाठी धावत होता. ती युवती जीव वाचवण्यासाठी सैरावरा पळत होती. जीव वाचवण्यासाठी तीने एका बेकरीत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन बेकरीतील व्यक्तीने शटर बंद केले. भर रस्त्यात हा थरार सुरू असताना अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. (Devendra Fadanvis)
मात्र, मुलीच्या ओरडण्याचा आवाज येताच लेशपाल जवळगे याने पीडितेच्या दिशेने धाव घेत तिला कोयत्याच्या हल्ल्यातून वाचवलं. पीडिता मदतीसाठी हाका मारत होती, तरीही तिच्या मदतीला कोणी आलं नाही. तेव्हा लेशपाल याने आपल्या जीवाची पर्वा न करता कोयता हातात घेऊन पीडितेच्या दिशेने धावणाऱ्या तरुणाला मागून दोन्ही हातांनी पकडलं. तिच्यावर वार होण्याआधीच लेशपालने तो वार उलटवला, त्यामुळे या पीडितेचा जीव वाचला.