मुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. या योजनेला राज्यभरातील महिलांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ही योजना केवळ निवडणुकीकरता आणली असून ती टिकणारी नाही असा सूर विरोधकांनी लावला आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून पोस्ट करत विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं आहे. ‘अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे’, असं म्हणत अजित पवारांनी या योजनेला अधिकाधिक निधी मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं आहे.
‘माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित…
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) August 6, 2024
आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांनी लिहलं आहे की,” ‘’माझी लाडकी बहीण योजना’ टिकवणं शक्य नसल्याचं विरोधी पक्ष सांगत आहेत. परंतु अशक्य गोष्ट शक्य करणं हीच माझी ओळख आहे. तोच माझा स्वाभिमान आहे. ही कल्याणकारी योजना विरोधकांना बंद पाडायची आहे, तसं त्यांनी स्पष्ट देखील केलं आहे कारण, ही योजना यशस्वीपणे राबवणं अशक्य आहे असं त्यांचे भाकित आहे. परंतु येत्या काळात या योजनेला अधिक बळकटी देवून या योजनेची रक्कम वाढवण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन. म न ही निवडणूक महिलांच्या हितासाठी आणि विरोधात असणाऱ्यांमध्ये आहे.. अशी पोस्ट अजित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ‘लाडकी बहीण’, ‘लाडका भाऊ..’ योजना अशा प्रकारच्या योजना आणण्यापेक्षा सरकारने थेट माझा लाडका मतदार योजना जाहीर करून टाकवी असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. अशी योजना जाहीर केल्यास थेट सगळ्यांना पैसे वाटण्याचा मार्ग मोकळा होईल. बाकी दुसरी काही भानगडच नको, अशी टीकाही राज ठाकरेंनी केली आहे. तर संजय राऊत यांनीही यावर टीका केली आहे. मात्र विरोधकांना अजित पवारांनी आता पोस्ट करुन उत्तर दिलं आहे
महाराष्ट्र सरकारच्या वतीने या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.