पुणे: राज्यात डान्सबारच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ऑर्केस्ट्रा बारच्या माध्यमातून डान्सबार चालविण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी डान्सबार विरोधी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले होते. हे विधेयक विधानसभेत मंजूर झाले आहे.

आतापर्यंत राज्यातील अनेक बारमध्ये ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम’ अंतर्गत ऑर्केस्ट्रा सादरीकरणासाठी परवानगी दिली जात होती. मात्र, या परवानगीचा गैरवापर करून काही ठिकाणी ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालविले जात असल्याच्या तक्रारी सरकारकडे प्राप्त झाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर सरकारने कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या तरतुदीनुसार, ऑर्केस्ट्रा सादरीकरणालाही डान्सबार विरोधी कायद्याच्या कक्षेत आणण्यात आले आहे. त्यामुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्याचा मार्ग अधिक सोपा होणार आहे.

सरकारच्या मते, या बदलामुळे कायद्यातील पळवाटांचा गैरफायदा घेण्याच्या घटनांना आळा बसण्यास मदत होईल. तसेच परवानगीच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या बार आणि संबंधित आस्थापनांवर अधिक प्रभावीपणे कारवाई करता येणार आहे.
या विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यातील बार व्यवसायासाठी लागू असलेल्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल होणार आहे. नव्या तरतुदींची अंमलबजावणी झाल्यानंतर संबंधित यंत्रणा अशा आस्थापनांवर अधिक कडक देखरेख ठेवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.






