मुंबई : सध्या विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल, राज्याचे कॅबिनेटमंत्री उदय सामंत यांच्यात बुधवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक पार पडली.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत अंतर्गत संघर्ष होत असल्याची चर्चा रंगत असतानाच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये झालेल्या या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे.
महायुतीचे जागावाटप आणि सरकारच्या योजन्यांवरुन मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून एकमेकांवरच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत होत्या. त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात असून याचा निवडणुकीक महायुतीला फटका बसू शकतो. त्यामुळे समन्वय साधण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तरचर्चा करण्यात आले आहेत. या योजनेचा प्रसार करत असताना समन्वय कसा असला पाहिजे, याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये खलबते झाली.