नागपूर : राज्यासह संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बीडच्या केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे दिसून येत आहे. या हत्या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन दिलं आहे. तसेच या प्रकरणी एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली. ‘वाल्मिक कराड याचा संबंध कुणासोबत आहे, याचा विचार न करता कारवाई केली जाईल. तसंच, देशमुख यांच्या हत्येत दोषी आढळल्यास वाल्मिक कराड याच्यासह सर्व आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले.
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला उत्तर देताना फडणवीस बोलत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘संतोष देशमुख यांच्याबाबत जे झालं, ते अत्यंत दुर्दैवी आणि निर्घृण आहे. या हत्येमध्ये वाल्मिक कराड नावाच्या गुंडाचा हात असल्याचं अनेक सदस्यांनी नाव घेऊन सभागृहात सांगितलं. त्यामुळं मी देखील त्याचं नाव घेऊन सांगतो. वाल्मिक कराड हा खंडणीच्या गुन्ह्यात दोषी आढळला आहेच, पण देशमुख यांच्या खुनाशी त्याचा संबंध असल्यास त्याला सोडणार नाही. तो कोण आहे? कोणासोबत त्याचे फोटो आहेत हे न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल. तसंच, या गुन्ह्यासह बीडमधील वेगवेगळ्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या सर्वांना मकोका लावण्यात येईल.
या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील. बीड जिल्ह्यातील लॉसनेस स्थिती पाहायला मिळतेय ती संपवावी लागेल. अवाडा एनर्जी यांनी फार मोठी गुंतवणूक पवनऊर्जा क्षेत्रात केलेली आहे. यातून मोठ्या प्रमाणावर कामं निघत आहेत, काही लोकांना रोजगार मिळतोय. काही काम आम्हालाच द्या नाही तर खंडणी द्या, अशा मानसिकतेत काही लोक वावरत असल्याचं पाहायला मिळतं. याच गुन्ह्यामध्ये 6 डिसेंबरला अवाडा एनर्जीचं ऑफिस आहे तिथं अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतिक घुले हे आरोपी तिथे गेले होते. त्यांनी वॉचमनला शिवीगाळ व मारहाण केली.
सिनियर प्रोजेक्ट मॅनेजरला त्यांनी मारहाण केली. मारहाण झाल्यामुळे पीडितांनी सरपंचांना कॉल केला. बाजुच्या गावातील आरोपी मारहाण करत असल्याने सरपंच आले. दादागिरी करत असल्याने सरपंचांच्या लोकांनी चोप दिला, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 9 डिसेंबरला संतोष अण्णा चारचाकी वाहनातून गावी परत जात होते. ते एकटेच होते. पेट्रोल पंपावर आतेभाऊ भेटले, त्यांना सोबत घेऊन निघाले. टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची स्कॉर्पिओ व एक गाडी वाट पाहत होती. टोल नाक्यावर जाताच त्यांनी गाडी अडवली. काच फोडून त्यांना बाहेर काढले, स्कॉर्पिओ गाडीत टाकून मारहाण केली.तारांनी गुंडाळून मारहाण केली. गाडीतून उतरवत मारहाण केली. ते मृत झाल्यावर हे सर्व लोक पळाले, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सरपंचांचा भाऊ हा सातत्याने विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. 15 ते 20 मिनिटांत सोडतो असे सांगत होता, पण सोडले नाही. प्रचंड मारहाण केली त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. सुरेश धस यांनी मुद्दा मांडला, त्यांचे डोळे जाळले नाही, डोळ्यावर मारहाण केलेली आहे, पण हा निर्घृण हत्या आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संतोष देशमुख हे एक उमदं नेतृत्व होतं. कोणाही व्यक्तीच्या जिवाचं मोल पैशात होऊ शकत नाही. मात्र, संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत राज्य सरकारकडून करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी यावेळी जाहीर केलं.