सिंधुदुर्ग : मालवण मधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी कोसळला. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पार्श्वभूमीवर वर्षा येथे एक तातडीची बैठक आयोजित केली होती. याबैठकीत त्यांनी पुतळा कसा कोसळला याची कारणे शोधण्यासाठी आणि या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसेसाठी एका तांत्रिक संयुक्त समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
येत्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तृत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकारांसह इतर तज्ज्ञ मंडळींचा सहभाग असणारी समिती नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह इतरही वरिष्ठ अधिकारी आणि सचिवांची उपस्थिती होती. नौदल अधिकाऱ्यांचीही या बैठकीसाठी उपस्थिती पाहायला मिळाली.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला नव्याने भव्य स्वरुपात तयार करणे आणि उभारणे यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, आयआयटी, स्थापत्य अभियंते, महाराष्ट्रातील नामांकित शिल्पकार, तसेच नौदलाचे तांत्रिक अधिकारी यांची एक समिती देखील नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या कामाला गती देण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत दिले आहे. शिवप्रेमींमध्ये या घटनेनंतर मोठा राग आहे. हे पाहता राज्य सरकारने तातडीची पावले उचलली आहेत.
दरम्यान, झालेली घटना दुर्दैवी आहे. नौदलाने हा पुतळा राजकोट येथे नौदल दिन साजरा करण्याच्या निमित्ताने एका चांगल्या भावनेने उभारला होता. भविष्यात आपल्याला अशी दुर्घटना परत कधीच घडू नये, यासाठी अतिशय काळजी घेतली पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.