भंडारा : कॉपीमुक्त अभियानाच्या नावाखाली चक्क बारावीच्या मुलींचे अंडरगार्मेट्स तपासल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला असून याचा धसका घेतलेल्या विद्यार्थिनींनी भीतीपोटी परीक्षा देण्यास नकार दिला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्राची अभ्रू वेशीला टांगण्यात आल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहापूर येथिल नानाजी जोशी कनिष्ठ महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज व नानाजी जोशी ज्युनिअर कॉलेज येथील विद्यार्थी परीक्षा देत आहेत. मात्र, डिफेन्स सर्विस जुनिअर कॉलेज शहापूर येथील विद्यार्थ्यांची तपासणी ही चुकीच्या पद्धतीने केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलींचे अंडरगार्मेंट्स तपासले गेले, असा आरोप काही मुलींनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना केला आहे.
विद्यार्थिनीच्या सांगण्यावरून डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज येथील प्रिन्सिपल यांनी तशी तक्रार शिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. पण मुलींना परीक्षेच्या वेळेला मानसिक त्रास होऊ नये, म्हणून मुलींनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिला आहे.
दरम्यान, नानाजी जोशी जुनिअर कॉलेजमध्ये असा कोणताही प्रकार घडलेले नाही. तर, शिक्षण विभागाच्या गाईडलाईन्स नुसार आम्ही मुलींची तपासणी केलेली आहे. आणि मुलींची तपासणी ही महिला शिक्षकांनीच केली असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज यांनी लावलेले आरोप बिनबुडाचे आहे असे मतही नानाजी जोशी येथील शिक्षकाने व केंद्र संचालकांनी व्यक्त केले आहे.
नानाजी जोशी महाविद्यालयातील प्रकार आता शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेला मात्र डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज येथील प्राचार्य यांनी हा प्रकरण सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे स्वतःच्या शाळेमध्ये बारावीचा सेंटर यावे याकरिता डिफेन्स सर्विस ज्युनिअर कॉलेज यांची खटाटोप तर नाही ना असाही सवाल या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. मात्र चौकशी अंतिम नक्की सत्य काय हे समोर येईल.